शनिवार, ७ जून, २०२५

बी एफ एफ – १

 

बी एफ एफ – १ 



खरं तर माझ्या दोन्ही आज्जी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई अशा दोघीही माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या. हो , होत्याच , कारण आता त्या दोघीही या जगात नाहीये. दोघीही अगदी स्वभावाने वेगळ्या पण माझ्यावर दोघींचाही खूप जीव होता.

वडिलांची आई म्हणजे इकडची आज्जी आणि आईची आई म्हणजे तिकडची आज्जी असं आम्ही लहानपणी बोलायचो. आता इकडची आज्जी म्हणजे स्वभावाने खूप कडक, खूप कष्टाळू पण माझ्यासाठी ती काही कडक नव्हती. आजी तशी सावळ्या रंगाची ,उंच , कपाळाला मोठ्ठ कुंकू असायचं नेहमी आणि नऊवार साडी नेसलेली असायची. पांढरेशुभ्र केस. मी कधीही आजीचा एकही काळा केस पाहिला नाही. कमी वयात पडलेल्या अतिरिक्त जबाबदारी मुले असेल असं कदाचित.  याउलट आजोबांचे काळे केस मला चांगलेच आठवतात. आज्जीला कधीही केसात एखादा गजरा माळलेला मी तरी पाहिलं नाही. फुलझाडांची तिला बिलकुल आवड नव्हती. एवढं मोठं बारदान सांभाळता सांभाळता तिला वेळच मिळत नसेल कदाचित. आजोबांनी काही झाडं लावली होती, त्यांना जी फुलं यायची ती फक्त देवाचीच असायची. साधारण धीर-गंभीर स्वभावाची म्हणजे आजोबांच्या अगदी उलट. आजोबा उंच गोरेपान ,सतत हसरे आणि कुठलीही गोष्ट गंभीरपणे घेणारे. आज्जीच सोवळं खूप कडक होतंबाहेरून येणार माणूस कोणताही असो अगदी आम्ही असलो तरी बाहेर हात पाय धुतल्याशिवाय कोणालाही घरात येण्याची परवानगी नव्हती. बाहेरच मोठा रांजण पाण्याने नेहमी भरलेला असायचा. त्यावर पितळेचा तांब्या पाणी घेण्यासाठी ठेवलेला असायचा.बाहेरच्या लोकांचे वापरायचे भांडे वेगळे असायचे, त्यांना बसायला द्यायची सतरंजी पण वेगळी असायची. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी एक पडवी होती. त्या घरात आलेले लोक बसायचेआजोबांसोबत सल्ला मसलत करायचे आणि निघून जायचे. पण घरात आलेला कुठलाही माणूस चहा पाणी घेता जाऊ नये यावर तिचे कटाक्षाने लक्ष असायचे. आल्या गेल्याचे आदरातिथ्य प्रेमाने करायची ती. दुपारची जेवण झाल्यानंतर मात्र ती कधी झोपलेली मला आठवत नाही. सगळी कामं आटोपल्यावर जेव्हा आसपासच्या बायका गप्पा मारत निवांत बसायच्या तेव्हा आज्जी मात्र वर्तमानपत्र वाचत बसायची आणि या गोष्टीच मला खूप कौतुक वाटायचं. कधीतरी आम्ही देखील आजोबांसोबत आणि आजीसोबत दुपारी बदाम सात चा पत्त्याचा डाव खेळत बसायचो.

जवळपास वयाच्या नव्वदीतही ती स्वतःची सगळी कामे स्वतः करत होती आणि इतरांना मदत देखील करत होती. तिला कधीही रिकामं बसलेलं मी तरी पाहिलं नाही. सगळी कामं आटोपली कि ती ओसरीवर लसूण सोलणे,भाजी निवडणे, तांदूळ निवडणे,चिंच फोडणे,वाती वळणे अशी कामं करत बसायची.

खेडेगावात राहून देखील आज्जीने आपलं वाचन जमेल तसं चालू ठेवलं. एव्हढा सोप्पं नव्हतं ते त्या काळी. आजोबांकडे पंचांग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकं यायची. सतत घरात माणसांचा राबता होता. आजोबांचा शब्द शब्द खरा असायचा म्हणून त्यांच्या शब्दाला लोकं मान द्यायचे. कधीतरी कोणी आजारी माणूस पत्रिका घेऊन आला कि आजोबांचं पाहिलं वाक्य असायचं कि वैद्याला दाखवून घ्या. पूर्वी आजोबा कल्याण ला शिक्षक म्हणून नोकरी करत होते. सगळ्या भावंडांमध्ये मोठे होते ते. आणि वडिलांच्या शब्दाला मान देऊन गावाकडची शेती,  घर आणि बाकीच्या भावंडांची जबाबदारी घेण्यासाठी नोकरी सोडली होती त्यांनी. सर्व मिळून नऊ भावंडं होती. त्यात आजोबा सगळ्यात मोठे. आज्जी आजोबानी त्यांची सगळी कर्तव्य पार पाडली. सर्व बहीण भावंडांची शिक्षण आणि लग्न. त्यात त्यांच्या पाचही मुलांना त्यांनी चांगले संस्कार दिले आणि योग्य ते शिक्षण देखील दिलं. खेडेगावात राहूनही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मागासलेपण नव्हतं. आजोबांच्या प्रत्येक निर्णयाला आज्जीने होकार आणि पाठिंबा दिला. त्याशिवाय एव्हढ मोठं गोकुळ , गाई , आलं-गेलं ,सणवार हे सगळं सांभाळणं सोप्पं नव्हतच.आज्जी आजोबा गावीच राहिले पण त्यांनी त्यांच्या बहीण भावांना मुंबई आणि नाशिकसारख्या ठिकाणी स्थिरस्थावर करून दिलं. त्यांच्याकडे कुठल्याही सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असला कि आज्जीला आवर्जून पुढे कोणीतरी येऊन घेऊन जायचे. तिकडे पण आज्जी खूप काम करायची. मला मात्र या गोष्टीचा खूप राग यायचा. आज्जीला काय कमी आहे? तिचे मुलं चांगल्या ठिकाणी नोकरी करतात. घरात दूध तूप कशाचीच कमी नाही , आज्जीने हाक मारली कि तिच्या चारही सुना तिच्या हाताखाली कामाला तयार असताना आज्जी का आजोबांच्या बहीण भावांकडे जाऊन काम करते? मी तिला विचारलं कि ती म्हणायची कि अशा प्रसंगी मदत करायची असते. पण मला काय ते पटायचं नाही. मुंबई नाशिक सारख्या शहराच्या ठिकाणी पण त्यांच्या बहीण भावांची मुलं नातवंड जेव्हढी शिकली नाही आणि जेव्हढी प्रगती केली केली नाही त्यापेक्षा किंबहुन जास्तच प्रगती तिच्या मुलांनी आणि नातवंडांनी केली होती. आज्जी तशी आधुनिक विचारांची होती. घरातील मुलींनी शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि मगच लग्न करावे असे तिला वाटे.

कुठल्याही प्रसंगात ती बाकीच्या लोकांसाठी भक्कम उभी असायची. त्या काळातील लोकं पण वेगळे होते आणि त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील वेगळाच होता. आज्जी आणि आजोबा दोघांनी देखील खेडेगावात राहून देखील स्वतःच शिक्षण आणि ज्ञान वाया जाऊ दिल नाही. त्यांच्या वागण्यातून ते दिसत होतं. सहसा आजीला खळखळून हसताना कोणी पाहिलं नाही, तशी ती कमी वयात पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळं धीर गंभीर बनली होती. पण आम्ही नातवंडांनी मात्र तिला आमच्या छोट्या छोट्या गंमतींवर हसताना पाहिलंय. आम्ही खूप गप्पा मारायचो. टीव्ही सिरिअल्स बद्दल, पेपर मधल्या बातम्यांबद्दल , झालंच तर हवा पाणी याबद्दल. रात्री अंगणात मस्त चांदण्यात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आज्जी आजोबांसोबत गप्पा मारायला मजा यायची. आम्ही सगळी नातवंड बिरबलाच्या ,भुताच्या, जादूच्या ,पऱ्यांच्या गोष्टी एकमेकांना सांगत झोपी जायचो. सकाळी आजीच्या आवाजातील तुळशीला पाणी घालताना म्हणायच्या स्तोत्राने आम्हाला जाग यायची. पहाटेच्या वेळी मस्त थंड गार वारा आणि पक्षांची किलबिल, गाईचा हंबरडा, त्यातच आई आणि काकूंची चहापाण्याची घाई, कोणी रांगोळी काढतंय,कोणी फुलं तोडून आणताय, कोणी गाईला चारा देत आहे तर कोणी देवपूजा करत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व काका काकू आणि त्यांची मुलं असा आम्ही सर्व किमान पंचवीस-तीस लोकं एकत्र येत असू. काय मज्जा यायची तेव्हा. पण तेव्हाही आजी आजोबांचा शब्द म्हणजे शब्द असायचा. मोठ्यांना तर त्यांचं ऐकवच लागायचं. आम्हा मुलांना कधी कधी सूट मिळत असे. आजी खूप कडक होती म्हणजे सासू म्हणून ती कडक होती. उगाचच आजकालच्या सासवांसारखं सून म्हणजे मैत्रीण असा काही तीच नव्हतं . काही गोष्टी वेळच्या वेळेवर आणि व्यवस्थित झाल्याच पाहिजे असा तिचा नियम होता त्यांच्यासाठी. त्याशिवाय एव्हढ्या लोकांना एकत्र बांधून ठेवणं सोप्पं नव्हतं हे आता कळतंय. पण आमच्यासाठी ती आमची लाडकी आणि प्रेमळ आज्जीच होती.

दिवाळीच्या सुट्टीची मज्जाच और होती. मस्त पहाटेची थंडी असायची. घरातील बायका लहानांना उठवायच्या. मग उटणे लावणे, सर्व मुलांना अंघोळी घालणे हा एक मोठा कार्यक्रमच असायचा. अंघोळी च्या वेळी फटाके वाजवणे हा आमचा आवडता खेळ होता. मग घरासमोरील एका मोट्ठ्या खोलीमध्ये सर्व मुलं फराळासाठी जमायचे. इकडे आजी, आई, काकू सगळ्याच स्वयंपाकघरात गरम गरम चकल्या, अनारसे ,पुऱ्या, शेव बनवून आम्हाला आणू द्यायच्या. पुढचा घाणा येईपर्यंत पहिला संपलेला असायचा. खूप मज्जा यायची. मग संध्याकाळी लक्ष्मीपूजनासाठी सर्व नवीन कोरे करकरीत कपडे घालून तयार असू. माझे बाबा सगळ्या मुलींसाठी एकसारखे फ्रॉक आणि सगळ्या मुलांना एकसारखे शर्ट घेऊन येत असत. सगळ्या स्त्रिया मस्त साड्या नेसून तयार होत. रांगोळी काढायचं काम आम्ही मुलीच करत असू. घरासमोर एव्हढी मोठी जागा होती कि घरापासून गाईच्या गोठ्यापर्यंत आणि तिथून समोरच्या खोल्यांपर्यंत शंभर पणत्या देखील अपुऱ्या पडत असत. डेकोरेशन ची सगळी कामे आम्ही सर्व नातवंड अगदी आनंदाने करत असू. घरातील पुरुष मंडळी दिवाळीची पूजा आणि मुलांकडे लक्ष देणे हि कामे अगदी आनंदाने पार पडत. गाईच्या गोठ्याजवळ फटाके वाजवायचे नाहीत हा अलिखित नियम होता. दुसऱ्या दिवशी सर्व महिला मंडळाचे माहेरची मंडळी म्हणजे भाऊ वडील त्यांना दिवाळीसाठी घेऊन जायला येत. आज्जी आणि आई मात्र दिवाळीसाठी म्हणून कुठेही जात नसे. तिच्या गाई गुरांसाठी आणि पाहुणे निघून गेल्यावर उरलेल्या तिच्या रित्या घराला अजून रितेपण येऊ नये म्हणून तिथेच थांबत असत.

आज्जी ताक करायला बसली कि आम्ही तिच्याजवळ बसायचो. संध्याकाळी गायीचं गरम गरम फेसाळलेलं दुध काढलं कि आज्जी आम्हाला दामटून ते घ्यायलाच लावायची. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रोज चुकता आजी हरिपाठ म्हणायची. तीच ऐकून आम्हा नातवंडाचा देखील हरिपाठ तेव्हा पाठ झाला होता. आजही आजीचा हरिपाठाचा स्वर जसाच्या तसा कानात घुमतो. तिची आरतीची स्वतःची अशी वेगळीच चाल होती. ‘’आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा’’ हे ऐकू आलं कि आम्ही आजीजवळ जाऊन बसायचो. मग ‘’गोड हरिनामाची साखर हि घ्या हो’’ या भजनाने सांगता व्हायची आणि आम्हाला खडीसाखर खायला मिळायची. किती निरागस दिवस होते ते. आता महागड्या हॉटेल मधलं डेझर्ट खाल्लं तरीही त्या खडीसाखरेची आणि त्या आनंदाची सर कधीच कशालाच येऊ शकत नाही. त्यानंतर कधीतरी आज्जीला तुझ्या हातचे कांदा लसणाचे थालीपीठ करून दे म्हणून आम्ही हट्ट करायचो. आई आणि काकू आम्हाला रागवायच्या कि आज्जी दिवसभर थकलीये. आम्ही स्वयंपाक करतोय तोच खा, पण आमच्यासाठी ती बिचारी उठायची आणि आम्हाला हवं ते करून द्यायची.

वयाच्या साधारण एक्क्याण्णवच्या आसपास ती पडली आणि त्यातून ती सावरली देखील. पण परत एकदा साधारण वर्षभरातच ती पडली आणि त्यानंतर तिची तब्येत बिघडतच गेली. मग तिने अंथरून जवळ केले. वयोमानाने दिसायला देखील कमी झाले होते तिला. पण तिला चहा जरी दिला तरी आधी त्यांनी म्हणजे आजोबांनी चहा घेतला का? असं विचारायची. आजोबांना आणि एकंदर सगळ्यांना जेवण  दिल्यानंतर स्वतः जेवायचं हि तिची सवय शेवटपर्यंत ती विसरली नाही. शेवटचे काही महिने तिला कोणी ओळखू येत नव्हतं आणि दिसतही नव्हतं. लग्न झाल्यापासून माझं देखील आजीला भेटणं कमीच झालं होतं. अधून मधून फोनवर बोलणं असायचं फक्त. मुलींना शाळेला सुट्ट्या मिळाल्या आणि आम्ही आज्जीला बरं नाही म्हणून भेटायला गेलो. आश्चर्य म्हणजे कोणालाही ओळखणाऱ्या आज्जीने माझं नाव लगेच ओळखलं तेही फक्त माझ्या आवाजाने. शेवटच्या काही दिवसात तिचे सगळे मुलं आणि सुना, मुलगी जावई तिच्याजवळ तिच्या सेवेत स्वतःचे सगळे काम सोडून गावाकडे येऊन थांबले होते. जवळपास महिनाभर सर्व तिच्या जवळ होते. हीच तिची खरी कमाई. आयुष्यभर तीच सगळ्यांना देत राहिली...प्रेम,  माया,  आधार,  पोटभर आणि वेळेवर खाऊ घातलं सर्वांना,  संस्कार दिले....तिला कोण काय देणार?  आणि कोणाकडून काहीही घेता एक दिवस ती शांतपणे निघून गेली कायमची. माझी लहानपणापासूनची  आणि अगदी कायमची बेस्ट फ्रेंड होती आज्जी. आणि कायमच राहील माझी बी एफ एफ - बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर!!!

Blog By

सुचेता जोशी गोसावी

बी एफ एफ – १

  बी एफ एफ – १   खरं तर माझ्या दोन्ही आज्जी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई अशा दोघीही माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या . हो ...