नैवेद्याचे महत्व
आता
आपण नैवेद्य म्हणजे काय ते पाहू.
देवाच्या पूजेवेळी किंवा आरतीआधी देवाला जो खाद्यपदार्थ अर्पण केला जातो त्याला नैवेद्य असे म्हणतात. पूजा किंवा आरती
झाल्यानंतर जेव्हा हा पदार्थ सर्वांना
वाटला जातो तेव्हा त्याला प्रसाद
असे म्हणतात.
नैवेद्याचे
काही प्रकार आपण पाहू.
१.
लघु नैवेद्य - दूध-साखर, पेढे,
गूळ, गूळखोबरे यांना लघु नैवेद्य असे
म्हणतात.
२.प्रसाद नैवेद्य - व्रतपूजा करताना दाखविल्या जाणाऱ्या नैवेद्यास प्रसाद असे म्हणतात. उदा.
सत्यनारायण पूजेला प्रसाद म्हणजे शिरा, सोळा सोमवार व्रताला
चुरमा ,लक्ष्मीपूजन वेळी लाह्या-बत्तासे
.
३.महानैवेद्य - खालील सर्व पदार्थांनी युक्त
असलेला नैवेद्य म्हणजे महानैवेद्य होय.
भक्ष्य
- पोळी, भाकरी इ. पदार्थ.
भोज्य
- भात ,खिचडी इ. पदार्थ
लेह्य
म्हणजे पंचामृत,चटणी इ. पदार्थ
चोष्य
म्हणजे आंबा, शेवगा शेंगा इ. पदार्थ
पेय
म्हणजे बासुंदी, खीर इ. पदार्थ
देवाला
महानैवेद्य वाढण्याची एक पद्धती आहे ती पुढीलप्रमाणे.
ताटाच्या किंवा केळीच्या पानाच्या डाव्या बाजूला चटण्या,कोशिंबिरी,लोणची असतात. उजव्या बाजूला सर्व प्रकारच्या कोरड्या
भाज्या आणि वरच्या बाजूस
पातळ भाज्या,आमटी आणि कढी
असते. खालच्या बाजूला पोळी आणि भाताची
मूद असते. मधोमध गोडाचा पदार्थ असतो. तळण पोळीजवळ असते.
असे भरगच्च आणि सकस आहार
असलेले ताट मग देवाजवळ
ठेवले जाते. नैवेद्याच्या ताटात कधीही मीठ वाढले जात
नाही. नैवेद्याच्या तटावर एक तुळशीपत्र नक्की
ठेवावे.
देवाला नैवेद्य
दाखवण्याची पारंपरिक पद्धत आता आपण पाहू.
ताट ठेवण्यापूर्वी त्याच्या खाली पाण्याचे एक
चौकोनी मंडल केले जाते.
आणि ताटाभोवती डावीकडून उजवीकडे पाणी फिरवले जाते.
दिवा आणि धूप त्यावरून
ओवाळाला जातो. त्यानंतर “प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा” असे म्हणत नैवेद्याचा
घास देवाच्या मुखाकडे न्यावा. त्यावेळी आपला डावा हात
आपल्या हृदया जवळ असावा, मान
झुकलेली असावी.असे करून झाले
की “मध्ये पानीयं समर्पयामि“ असे म्हणून उदक
द्यावे. नैवेद्य देवासमोरून लगेच उचलू नये.
तसेच नैवेद्याला किड्या मुंगी लागणार नाही याची काळजी
घ्यावी. पाण्याचे मंडल यासाठीच केले
जात असावे असे वाटते. प्रसन्न
चित्ताने नमस्कार करून मग आरती
करावी. त्यानंतर हाच नैवेद्य प्रसाद
म्हणून सर्वांना वाटावा.
वेगवेगळ्या
देवतांना वेगवेगळा नैवेद्य विशेष आवडतो अशी मान्यता आहे.
जसे कि गणपतीला मोदक,
कृष्णाला लोणी-साखर, विष्णू
आणि देवी लक्ष्मीला खीर
इतर. तसेच नैवेद्य नेहमी
सात्विक असावा अशी मान्यता आहे.
नैवेद्य कधीही उष्टा केलेला नसावा. तसे असेल तर
तो देवाला मान्य होत नाही असे
म्हणतात.
जे लोक मानसपूजा करतात ते देखील मानसपूजेमध्ये
मन एकाग्र करून देवाला मानसनैवेद्य
दाखवतात.
बाकी
काहीही असेल तरी निर्मळ
मानाने दाखवलेला साधासुधा नैवेद्य देखील देव गोड मानून
घेतो आणि आशीर्वाद देतो.
खरं तर तो कुठे
स्वतः नैवेद्य खातो? पण भक्त किती
प्रेमाने नैवेद्य दाखवतोआणि समोर वेगवेगळ्या पदार्थांच्या
घमघमाटाने भरलेले ताट संयमाने देवासमोर
ठेवतो, कसा घासातला घास
दुसऱ्याला देतो हे तो
बघतो आणि भक्तांना मनापासूनआशीर्वाद
देतो. आपल्याला मनोवांछित फल देतो.
पितरांना
देखील श्राद्धपक्षात नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य देवाच्या
नैवेद्याच्या अगदी उलट पद्धतीने
वाढतात. या
ताटामध्ये काही पितरांना आवडणाऱ्या
पदार्थांचा देखील समावेश असतो. आपले पूर्वज म्हणजेच
पितर देखील हा नैवेद्य पाहून आपल्याला मनापासून आशीर्वाद
देतात आणि आपल्या मनोकामना
पूर्ण करतात.
लेखिका
सुचेता जोशी गोसावी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा