एकदा काय झालं
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा गावागावात बँकांचे संगणकीकरण सुरु होते. असेच आमच्या गावाजवळच्याच काही बँकांमध्ये माझी सॉफ्टवेअरची काही कामं चालू होती. त्याशिवाय बँकेच्या मॅनेजर्सना सॉफ्टवेअर कसे वापरायचे आणि त्यामध्ये अचानक काही समस्या उद्भवल्या तर काय करायचे,यांचेदेखील ट्रेनिंग देण्याचे काम सुरु होते. साधारण ४-५ बँक आणि त्यांच्या शाखा माझ्या अखत्यारीत होत्या. नियमितपणे त्या-त्या शाखांना भेट देणे आणि कामाची पाहणी करणे यासाठी रोजच्या रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागत असे. त्यातल्या त्यात रोज सगळी कामे आटोपून रात्री घरी जायला मिळायचे हेच काय ते या धावपळीत सुख होते. १२वी नंतर पुढील सर्व शिक्षण घेण्यासाठी घर सोडावे लागले होते. पण रोजच्या रोज घरी जायला मिळणार म्हणून मी ही नोकरी आनंदाने स्वीकारली होती. त्यातल्या त्यात आमच्या ऑफिस मध्ये सर्व पुरुष आणि मी एकटीच महिला असल्याने मला जरा लवकर घरी जायला मिळायचे. पण त्या दिवसाचे सर्व काम मला त्यांच्याइतकेच पूर्ण करून रिपोर्ट बनवावा लागत असे.
असेच एकदा तालुक्याच्या ठिकाणी मार्च एन्ड असल्याने खूप काम होतं. मी अगदी सकाळी ८ पासून काम सुरु केले.पण त्या दिवशी जर ते सर्व काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले, तर परत त्या बँकेत वरचेवर चकरा माराव्या लागणार नव्हत्या. मी जरा जास्तच मनावर घेतलं. मुख्य बँकेचं काम पूर्ण करून ऑफिस मध्ये आनंदाने फोन केला तर आमच्या बॉस ने मला त्यांच्या अजून दोन शाखांचा प्रॉब्लेम झाला आहे असं सांगितलं. आता मला एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वर्षभराची अकाउंट्सची पाहणी करून, त्यांचे रेकॉर्डस् आणि कॉम्प्युटर्सचे रेकॉर्डस् यातील तफावत शोधून काढायची होती. मी लगेच पुढच्या प्रवासाला निघाले. बस स्टॅण्डवर बसची बराच वेळ वाट बघत होते पण बस काही येईना. मला पुढची कामे डोळ्यासमोर दिसू लागली. शिवाय उशीर झाला तर गावी जायला पुढची बस मिळणे अवघड होते. शेवटी एक बस आली, पण खूप गर्दी होती. मी बस मध्ये चढणार तोच माझ्या पर्सला झटका बसल्यासारखं झालं आणि मी वळून मागे पाहिलं तर काय! एक साधारण ८-९ वर्षाची मुलगी माझी पर्स ओढून, तिची चैन खेचण्याचा प्रयत्न करत होती. मी पटकन तिचा हात घट्ट पकडला. पण लोक एवढ्या घाईघाईने आत घुसत होते कि मी तिचा हात झटकला आणि रागाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकून “परत असं करू नकोस”, एव्हढच बोलले आणि बसमध्ये गेले तशी बस सुरु झाली. मी तिच्याकडेच बघत होते. एक हाडकुळी मुलगी, तिचे कपडे अस्वच्छ होते, केस विस्कटलेले होते आणि ती देखील माझ्याकडेच बघत होती. बस हळूहळू पुढे जाऊ लागली तसे माझ्या मनात विचार येऊ लागले कि या मुलीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं असतं तर काय झालं असतं? का जाऊ दिलं मी तिला? आणि माझे पैसे जर खरंच तिने चोरले असते तर पुढे अजून दोन ठिकाणी मी कशी पोचणार होते? मी तिला सोडून दिलं हे बरोबर आहे का? त्यानंतर मी पुढील दोन्ही कामे आटोपून घरी गेले. घरी जायला चांगलाच उशीर झाला होता. ऑफिस मधील ठरलेली कामे व्यवस्थित पार पडल्यामुळं मी खुश होते. नंतर जवळपास महिनाभर मी तालुक्याच्या गावी गेले नाही. काही समस्या आलीच तर ते आम्ही फोनवरच सोडवत असू. एकदा महिनाभराचं कामाचं मूल्यमापन करण्यासाठी आणि बँकेतील लोक या संगणकीकरणाला कसे सरावले आहेत हे बघण्यासाठी मी त्या शाखेत गेले. काम अगदी व्यवस्थित चालू होतं हे बघून बरं वाटलं. मी घरी जायला निघाले आणि पुन्हा त्याच बस स्टॅण्डवर तीच मुलगी, ज्या मुलीने माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न केला होता, ती दिसली. अंगावर साधारण पण स्वच्छ कपडे होते आणि ती गजरे आणि फुगे विकत होती. मला हे पाहून खूप आश्चर्य वाटले. त्या दिवशी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली नाही याचा आनंद पण झाला. खरं तर तिच्यातील हरवलेला स्वाभिमान तिला परत मिळला म्हणून मला आनंद व्हायला पाहिजे होता, पण पोटासाठी तिला काम करावं लागत होतं, आणि त्यात तिचं बालपण मात्र हरवलं होतं. याचं मात्र मला खूप वाईट वाटत होतं. ज्या वयात मुलं आई-वडिलांकडे हट्ट करतात, मित्र मैत्रिणींसोबत खेळतात, शाळेत जातात, त्या वयात ही मुलगी दिवसभर उन्हात उभं राहून फुगे आणि गजरे विकत होती. पण काही का असेना स्वतःच्या पोटापुरते प्रामाणिकपणे कमवत होती. तिला तिचा हरवलेला स्वाभिमान सापडला पण त्यात तिचं बालपण मात्र हरवलं होतं. मी कुठलीही ओळख न दाखवता तिच्याकडून एक गजरा घेतला आणि निघाले.
सुचेता जोशी गोसावी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा