रविवार, २६ जानेवारी, २०२५

प्रजासत्ताक दिन

 

प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.

भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान २६ नोव्हेंबर .. १९४९ रोजी स्वीकारले २६ जानेवारी .. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले.

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत,नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.

अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात.

राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात २१ तोफांची सलामी दिली जाते.

त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

१०या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आदर व्यक्त केला जातो.

११या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌. अनेक शाळा महाविद्यालयात या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव दिला जातो. विद्यार्थी नृत्य,भाषण,नाटक,गायन,विविध खेळ आदी मधून आपले गुण प्रदर्शन करतात.

१२प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे.

पण हा दिवस आपल्याला असाच मिळालेला नाही. या दिवसासाठी आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. भगतसिंग,राजगुरू,सावरकर,नेताजी सुभाषचंद्र बोस,चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही बोटावर मोजण्याइतकीच नावे आपल्याला माहिती आहेत. पण अशी हजारो लोक आहेत, ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी देहत्याग केला, पण त्यांची नावे इतिहासात कधीच आली नाही. पण म्हणून त्यांनी दिलेले बलिदान वाया जात नाही, आणि त्यांचे महत्व देखील कमी होत नाही.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन खूप उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो पण फक्त या दोन दिवसच राष्ट्रप्रेम राष्ट्रगीत ऐकल्यावर का उफाळून येते? हे राष्ट्रप्रेम असेच परस्परांमधील ऐक्य टिकवून निरंतर सगळ्यांच्या हृदयात जागृत राहू दे हेच मागणे या आकाशात फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रध्वजाकडे आहे.तेव्हाच या प्रजासत्ताक दिनाला खरा अर्थ प्राप्त होईल.

लेखिका

सुचेता जोशी गोसावी

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

मकर संक्रांती महत्व

 

मकर संक्रांती महत्व

मकर संक्रांती चा शाब्दिक अर्थ:

'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो.लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते १५ जानेवारीला येते, अन्यथा १४ जानेवारीला असते.या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते.


संक्रांतीची प्रादेशिक नावे:

मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल,तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात) किंवा सोप्या भाषेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया), आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर) अशा विविध नावांनी ओळखले जातात..

मकर संक्रांती पौराणिक कथा:

)सूर्याला दोन पत्नी होत्या , पहिली संज्ञा आणि दुसरी छाया . संज्ञाचा मुलगा म्हणजे यम आणि छायाचा मुलगा म्हणजे शनी. एकदा सूर्याने छायाला दुजाभाव करताना पाहिले आणि सूर्याचा पारा चढला. त्याने छायाला आणि तिच्या मुलाला म्हणजे शनीला स्वतःपासून दूर केले. त्यामुळे दोघेही संतप्त झाले त्यांनी सूर्याला कुष्ठरोगाचा शाप दिला. सूर्याला झालेला हा त्रास यमाला बघवेना आणि त्याने त्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि सूर्याला शापमुक्त केले. संतप्त झालेल्या सूर्याने शनीचे घर असलेल्या कुंभ राशीला जाळून टाकले. परंतु यमाने दोघांमध्ये क्षमायाचना करून सामंजस्य घडवून आणले. यावर सूर्य प्रसन्न होऊन शनीला भेटायला गेला असता शनीने फक्त घरात असलेले काळे तीळ सूर्याला वाहून त्याला नमस्कार केला तो दिवस संक्रांतीचा होता. त्या दिवशी जो कोणी तिळाचे दान करतो त्याच्यावर सूर्य नेहमी प्रसन्न होतो आणि त्याला शनी कधीही त्रास देत नाही.

)अशी देखील कथा आहे कि या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले.

)याशिवाय असे देखील मानले जाते कि महाभारतात भीष्म हे बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते.ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राण सोडला. तो दिवस मकरसंक्रांतीचा होता. मकर संक्रांतीला त्यामुळे शुभ मानले जाते.

संक्रांत हा सण कसा साजरा करतात:

भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना आणि देवाला दिले जाते. संपूर्ण भारतात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तसेच सर्वांची साजरा करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. शिवाय या सणाला करण्यात येणारे पदार्थ देखील वेगळे आहेत.

संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.

आता आपण संक्रांत महाराष्ट्रात कशी साजरी करतात याची माहिती पाहू.

)या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

)बायका उखाणे घेतात.

)एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात.

४)या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांचे विशेष महत्व आहे. शक्यतो इतर कुठल्याही सणाला काळे कपडे चालत नाहीत.

)नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते.

)लहान मुलांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालतात  त्यांना हलव्याचे दागिने घालतात. अशा  पद्धती दिसूनयेतात.चुरमुरे, बोरे,हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण करतात.

महाराष्ट्रात या दिवशी तीळ गुळाला जास्त महत्व आहे.या दिवशी तिळगुळाची पोळी आणि लाडू केले जातात.

या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:|

तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।

मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात , त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो ,असे म्हणतात.  यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात.

संक्रांत साधारण तीन दिवस साजरी होते.

) भोगी

संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात.या दिवशी शेतात मिळणाऱ्या सर्व भाज्यांची मिळून एकाच भाजी केली जाते त्यात तिळाचा कूट वापरला जातो. याशिवाय बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी केली जाते. आणि तांदळाची खिचडी देखील केली जाते.

) संक्रांत

संक्रांतीच्या दिवशी काळे किंवा नवीन कपडे घालून तिळगुळाची पोळी लाडू खाल्ला जातो.

)किंक्रांत

संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या त्रासातून लोकांना सोडवले. हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. हा दिवस करिदिन म्हणून देखील पाळला जातो. हा दिवस शुभकार्याला चालत नाही .मात्र या दिवशी छोट्या मुलांचे बोरन्हाण केले तर चालते.

संक्रांतीच्या आहाराचे महत्व:

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर पदार्थांचा वापर जेवणात करतात.

 

संक्रांतीला काळे कपड्यांचे महत्व:

संक्रांत थंडीमध्ये असते. अशा वेळी शरीराला उबेची खूप गरज असते. काळ्या रंगामध्ये सूर्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. म्हणून काळ्या रंगाचा वापर केला जातो.

”तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत हा सण सगळे आनंदाने साजरा करतात. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा मनात साठवून ठेवून एकमेकांचे बंध घट्ट करतात. गुलाबी थंडीमध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. संक्रांतीनंतर मात्र थंडी हळूहळू कमी होऊ लागते. अशी हि संक्रांत लोक रथसप्तमी पर्यंत साजरी करतात. तसेच या दिवशी अंगणात सूर्याचा रथ काढला जातो आणि सुगडामध्ये दूध देखील उतू घातले जाते.सुवासिनी रथसप्तमीपर्यंत एकमेकींना वाण देऊन हळदीकुंकू करतात.

असा हा सण आपल्याला सूर्याचे आपल्या जीवनातील महत्व सांगून जातो.

 

लेखिका

सुचेता जोशी गोसावी

 

बी एफ एफ – १

  बी एफ एफ – १   खरं तर माझ्या दोन्ही आज्जी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई अशा दोघीही माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या . हो ...