रविवार, १२ जानेवारी, २०२५

चित्रपट समीक्षण

 

चित्रपट - दो आँखें बारा हाथ

दिग्दर्शक - व्ही.शांताराम 

कलाकार - व्ही. शांताराम, संध्या , बाबुराव पेंढारकर, बी. एम. व्यास आणि इतर अनेक दिग्गज कलाकार. 

प्रदर्शनाचे वर्ष – १९५७

संगीत दिग्दर्शक - वसंत देसाई, भरत व्यास

पटकथा - ग. दि. माडगूळकर

गायक - मन्ना डे , लता मंगेशकर

हा चित्रपट राजकमल कलामंदिर ने १९५७ साली प्रदर्शित केला. चित्रपटमहर्षी व्ही.शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रसृष्टीतील एक अभिजात कलानिर्मिती आहे. या चित्रपटाला भारत सरकारकडून 'उत्कृष्ट हिंदी चित्रपट ' आणि 'सर्वोत्कृष्ट चित्रपट ' म्हणून सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले. आठव्या बर्लिन महोत्सवात चार 'फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड ', 'एक्सऑर्डिनरी प्राईझ ऑफ ज्युरी' आणि 'गोल्डन बेअर'(१९५८) हे अवॉर्ड्स मिळाले. याशिवाय 'सिल्वर ब्लॅक ' हा पुरस्कार (१९५८) आणि हालिवूड फोरेन प्रेस तर्फे 'सॅम्युअल गोल्डविन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड - गोल्डन ग्लोब (१९५९) ' इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आले . देशविदेशात या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले गेले.

हा चित्रपट एकंदरीत कैद्यांच्या जीवनावर आधारित आहे. याची सुरुवात होते तीच जेलच्या भिंतींवर उमटलेल्या रक्ताने माखलेल्या बारा हातांनी. हे हात त्या सहा कैदयांचे आहेत ज्यांना कलाम ३०२ खाली शिक्षा झाली आहे आणि जेलर त्यांच्या हृदयपरिवर्तनाचा प्रयत्न करत आहे. त्यांना माणुसकीच्या मार्गाने परत एकदा माणसात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गुन्ह्याचा शिक्का बसलेला माणूस हा कायमचा गुन्हेगार नसून त्याला परत सामान्य नागरिकाचे जीवन जगण्याचा अधिकार आहे असा विचार या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न आहे.

या चित्रपटातील बारा हात आहेत सहा बेदरकार खुनी कैद्यांचे आणि दोन डोळे आहेत जेलर म्हणजेच व्ही. शांताराम यांचे. याच डोळ्यांना घाबरून आणि याच दोन डोळ्यांवर विश्वास ठेऊन हेच सहा कैदी एका छोट्याशा गावात जेलर सोबत राहायला जातात. पहार, कुदळ, कोयता आणि कुऱ्हाड अशी अवजारे त्यांच्या हातात सोपवली जातात ज्या अवजारांनी यापूर्वी त्यांनी गुन्हे म्हणजे विनाश केला होता. त्यांना जेलर समजावतात कि याच अवजारांमध्ये योग्य वापर केला तर कशी सृजनन शक्ती आहे.याच गावात एक खेळणी विकणारी- चंपा ही एक  निर्भय ग्रामीण स्त्री आहे. चंपा हि भूमिका संध्या यांनी अतिशय सुंदर प्रकारे साकारली आहे. त्यातील तिच्या काही प्रसंगांमुळे आणि काही गीतांमुळे वातावरण हलके फुलके आणि हळुवार बनते. 

एका ओसाड अशा जमिनीमध्ये ते सहा कैदी त्यांच्या बारा हातांनी नंदनवन फुलवतात आणि हाच फुलवलेला भाजीपाला ते बाजारात विकायला घेऊन जातात. याच कष्टाला कंटाळून ते पळून जाण्याचा देखील प्रयत्न करतात परंतु जेलर च्या दोन डोळ्यांच्या धाकाने आणि त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे ते परत येतात आणि कष्ट करू लागतात. तिकडे शेतकऱ्यांची भाजी मातीमोल किमतीने घेणाऱ्या व्यापाऱ्याला मात्र हि गोष्ट खटकते. तो या कैद्यांना दारू पाजून भुलवण्याचा प्रयत्न करतो, प्रसंगी मारहाणही करतो परंतु त्या कैद्यांच्या मनामध्ये जेलर ने केलेले संस्कार रुजू लागतात. ते गांधीमार्गाने याचा विरोध करतात. शेवटी जेव्हा यांच्या शेतात व्यापारी बैलांची टोळी घुसवून सर्व उधवस्त करू पाहतो तेव्हा स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन जेलर पिकाची रक्षा करतो.याच प्रसंगी ''ए मलिक तेरे बंदे हम'' हे गीत आहे. परंतु त्याचे हे बलिदान व्यर्थ जात नाही. सर्व कैदी शेवटी तिथेच राहून त्याचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार करतात.येथे चित्रपट संपतो .

चित्रपट संपल्यावर देखील कितीतरी काळ तो आपल्या मनावर रेंगाळत राहतो. शेवटी जेलर गेल्याचे शल्य आणि कैदी सुधारल्याचे समाधान मनात रेंगाळत असते. माणुसकीची आणि चांगुलपणाची छाप मात्र कायमची  मनावर राहते. अशा सर्वच बहुगुणी आणि सर्वोत्कृष्ट मंडळीनी एकत्र येऊन या अजरामर आणि माणुसकीची महती पटवून देणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सर्वच कलाकारांना शतशत नमन.

लेखिका

सुचेता जोशी गोसावी

 

बी एफ एफ – १

  बी एफ एफ – १   खरं तर माझ्या दोन्ही आज्जी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई अशा दोघीही माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या . हो ...